स्वतःला जाणून घ्या
[ भाग पहिला - शरीर आणि मन ]
कुठल्याही कामासाठी पुढचे पाऊल उचलण्या आधी आपण स्वतःला जाणून घ्यायला हवे . कारण खूप वेळा असे होते कि आपली इच्छा काही तरी वेगळेच करायची असते , पण आपल्या शरीराची ती कुवत नसते . अशावेळी एकतर आपल्या जवळ खूप जबरदस्त इच्छा शक्ती असायला हवी किंवा आपण आपले मन अशा कामात गुंतवायला हवे जिथे आपली शारीरिक कुवत कमी पडणार नाही . मी लोकांना खुपदा म्हणतांना बघितले आहे ,'' मी माझ्या स्वतःला खूप चांगल्याने जाणतो . तुम्ही कोण मला माझ्याविषयी ज्ञान देणारे ?'' माझा त्यांना एकच सवाल आहे ,
'' एवढ्या चांगल्या रीतीने स्वतःला जाणता , मग स्वतःला झेपत नाहीत ती कामं करून स्वतःचेच हसू का उडवण्याची इतरांना संधी का देता ?''
कसे ? एका उदाहरणाने समजावते , एक एकवीस वर्षांची मुलगी आहे . तिचा हट्ट आहे विश्व सुंदरी बनण्याचा . पण तिची उंची फक्त पाच फुट आहे आणि इथे तर प्रवेश पात्रतेत पाच फुट पाच इंच एवढी उंची हवी आहे . असे असतांना तिचा हट्ट हा मूर्खपणाच समजावा लागेल कि नाही ? तिचे स्वतःच्या शरीराला , उंचीला दोष देणे अयोग्यच म्हणावे लागेल ना ?
हे झाले शारीरिक कुवतीचे . आता मानसिक कुवत बघू . म्हणजे आपले मन ! जे मनाने कच्चे असतील , खूप भावूक असतील त्यांना मी एकाच सल्ला देईल , तो असा कि त्यांनी चुकूनही वकील , डॉक्टर किंवा पोलीस बनू नये . अन राजकारणाचा तर विचारही करू नये . कारण हि चार हि क्षेत्र अशी आहेत कि इथे तुमचे मन खंबीर असणे खूप गरजेचे आहे . नाहीतर तुमचा या क्षेत्रात टिकाव लागणार नाही . आणि तुम्ही स्वतःच , स्वतःच्या असफलतेचे कारण व्हाल . तेव्हा आपण शरीराने तसेच मनाने काय आहोत ? आपल्याला काय झेपेल आणि आपण कोणते कार्य अगदी चोखपणे पूर्ण करू शकू ? ह्याचा अभ्यास करून , मगच योग्य तो निर्णय घ्यावा . प्रत्येक दिवशी , प्रत्येक क्षणी , प्रत्येक कार्य करतांना स्वतःला विचारावे ,' मी काय आहे ? मी हे कार्य करण्याच्या योग्य आहे ना ? मला हे झेपेल ना ?' स्वतःचा , आपल्यातील स्व चा अभ्यास करायची सवय करा . म्हणजे तुम्हाला नक्की कशाची गरज आहे ह्याची प्रचीती तुम्हाला येईल .
शारीरिक आणि मानसिक फरक - आपले शरीर हे आपले सर्वांना दिसणारे , दृश्य असे बाह्य रूप आहे , तर आपले मन हे आपले अदृश्य असे आंतर रूप आहे . शरीर आपली शारीरिक , म्हणजे दृश्य स्वरूपातील कुवत ठरवते . तर त्याच वेळी मन आपली मानसिक , म्हणजे अदृश्य स्वरूपातील क्षमता ठरवते . शेवटी तुमच्या सर्व शारीरिक कृती ह्या तुमच्या मानसिकतेतूनच जन्मलेल्या असतात .
अशाप्रकारे एकदा का तुम्ही तुमच्या स्वतःला समजून घेतले तर तुम्हाला फक्त तुमच्या शारीरिक हजेरीचेच ज्ञान होणार नाही , तर तुमच्या मनाबद्दल सुद्धा तुम्ही जागृत राहाल . तुमचे मन काय विचार करतेय ? त्याची भावूकतेची पातळी काय आहे ? तुमचे मनाचा कल कुठे आहे ? ह्याची माहिती आपल्याला आपोआप होईल .
Comments
Post a Comment