संस्कार
माझ्या बालपणी , आमच्याकडे दिल्ली दूरदर्शन म्हणजे डीडी वन हि एकच वाहिनी होती . त्या एकाच वाहिनी मध्ये आम्ही खूप आनंदी होतो . दिल्ली दूरदर्शन वर दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत प्रादेशिक भाषेतील कार्यक्रम असायचे . आपली प्रादेशिक भाषा मराठी असल्यामुळे , महाराष्ट्रात मराठी कार्यक्रम असत . त्यातील एक मराठी मालिका मला अगदी हृदया पासून आवडायची . त्या मालिकेत मुख्य कलाकार मोहन जोशी होते . मालिकेचे नाव ' संस्कार ' होते कि ' मना घडावी संस्कार ' होते , हे काही नक्की आठवत नाही . आणि आठवणार तरी कसे ? नंतरच्या आयुष्यात एका मागे एक क मालिका [ एकता कपूर निर्देशित कसम , कुंडली , कुटुंब कसौटी जिंदगी कि , क्योंकी ....यादी खूप लांब आहे .] बघण्यात आल्या आणि आमचे संस्कारच बदलवून गेल्या . पण या मराठी मालिकेचे गीत ' मना घडावी संस्कार ' माझ्या मनाच्या एका कप्प्यात दडलेले आहे . जेव्हा केव्हा संस्कार हा शब्द कानावर पडतो , तेव्हा हृदयात झोपलेले शब्द जागृत होऊन जणू गायला लागतात ,
तेज स्पर्शाने दूर होई अंधार ,
जैसा मुळांचा वृक्षात असे आधार ,
शिल्पास आकारी जैसा , शिल्पकार !
मना घडावी संस्कार !
आणखी पुढे काही कडवी आहेत . पण आठवत नाहीत . किती काही दडले आहे ना संस्कार या एका शब्दात ! या शब्दाची मर्यादा पूर्ण अशी व्याख्या अजूनतरी मी ऐकली नाही . पण एवढे माहित आहे कि जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपली जी काही जडण घडण होते तिला संस्कार म्हणतात . आपण जसे वागतो बोलतो राहतो , त्यावरून आपल्यावर [ चांगले - वाईट ] कशा प्रकारचे संस्कार करण्यात आले आहेत ह्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला होते . म्हणूनच तर आपल्या हातून काही वाईट गोष्ट घडल्यास किंवा आपण कोण सोबत वाईट वागल्यास ,एक वाक्य हमखास आपल्याला ऐकवले जाते ,' हेच संस्कार दिलेत वाटतं तुझ्या आई बाबांनी तुला !' पण असे बोलतांना ते एक विसरतात , कि मुलांना संस्कार हे फक्त त्यांच्या माता - पित्या कडूनच मिळत नसतात . तर ते समाजातील प्रत्येक घटकाकडून आपल्यावर होत असतात . म्हणूनच तर आपण अगदी तसेच बनतो जशा लोकांमध्ये आपण वावरतो , जशा परिस्थितीत आपण लहानाचे मोठे होतो . पुढे जस जशी परिस्थिती बदलते आपल्यातही बदल आपोआपच घडून येतात . असे हे जे मनाला घडवतात , आपल्या आयुष्याला योग्य असे वळण देऊ शकतात . असे योग्य संस्कार योग्य वयात , योग्य वेळी मुलांना द्यायला आज कुणा जवळच वेळ नाही . आपण खूप पुढारलो , पाश्चात्त्य संस्कारांनी सुधारलो , पण हा संस्कार अधुरा , अपुरा आहे असे नाही वाटत का आपल्याला ? आपल्या या अपुऱ्या सुधारणे पायी ' संस्कार ' देण्यात मुख्य भूमिका निभावणाऱ्या समाजाची काय गात झालीय , हे माहित आहे आपल्याला ? इथे बाल पूल उचलायला शिकत नाही तो त्याला पाळणा घरात किंवा नर्सरीत टाकले जाते . एक अनोळखी व्यक्ती मशिनी प्रमाणे एकाच वेळी दहा ते वीस बाळांचा सांभाळ करते .ती एकटी एवढ्या बाळांमध्ये तुमच्या बाळाला किती वेळ देऊ शकत असेल ? जसे आईचे वात्सल्य , फक्त आईच देऊ शकते . तसे आईने द्यायला हवे ते संस्कार आणखी कुणाला कसे देता येतील ? संस्कार तर आईच्या प्रेमातून , बाबांच्या अनुभवांमधून आणि आजी आजोबांच्या गोष्टींमधून वेचून घ्यावयाचे असतात . आज गल्लो गल्ली व्यक्तीमत्व विकासाचे वर्ग घेतले जातात . तेथे कसोशीने शिष्टाचारांचे पालन कसे करायचे ते शिकवले जाते . तरीही आपली तरुण मंडळी अशी उद्धट का वागते ? असा प्रश्न पडतो ना पालकांना ? त्यांच्या तशा वागण्यामागे कारण असे कि त्यांना वर्गात ते शिष्टाचार फक्त कामोकामी [ म्हणजे मुलाखतीच्या वेळी किंवा परीक्षेच्या वेळी ] वापरायची शिकवणूक दिली जाते . मी स्वतःला खूप धन्य समजते . कारण लहानपणी माझे आजी आजोबा माझ्या जवळ होते .आम्हा भावंडांचा रिकामा वेळ टि व्ही बघण्यात जात नसून , तो वेळ आजीच्या गोष्टी ऐकण्यात जायचा . खूप मजा यायची तेव्हा , काही वेळासाठी आम्ही , राजा - राणी , परी , जादुगार , राक्षस , चेटकीण , देव , दानव , डाकू आणि बोलक्या प्राण्यांच्या जगात स्वतःला विसरून जायचो . आमची शाळा भरायची डोंगर माथ्यावर , बोराच्या झाडाखाली , चिंचेच्या झाडावर आणि तिथे शिक्षक म्हणून सोबतीला असायचा हा निसर्ग . म्हणूनच या निसर्गावर आतोनात प्रेम आहे माझे . पण तो हि लोप पावतोय या सिमेंट काँक्रिटच्या वास्तवात . आजी आजोबांच्या गोष्टी हरवल्यात . ते हि अडकलेत आता इंटरनेटच्या जाळ्यात . ज्यामुळे आपल्या संस्कारांमधील उणीव दिवसेंदिवस वाढत आहे . जेव्हा हि मी आजच्या पिढीला आपल्या सर्व मर्यादांना पायाखाली तुडवून , मनाला येईल तसे वागतांना बघते , तेव्हा माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजते ,' माझी मुलं सुद्धा अशीच वागतील का ? माझ्या चोरून दारू च्या पार्ट्या करतील का ? कि ' मेरे मन को भय मैने कुत्ता काट के खाया ' असे म्हणून माझ्या समोरच सिगारेट चे झुरके ओढतील ? मी बांधु शकेल त्यांना माझ्या आईने मला दिलेल्या मजबूत संस्कारात ?' या प्रश्नांना उत्तर तर काळच देईल . पण आशा करते कि मी तरी माझी जबाबदारी योग्य रीतीने पार पडू शकेल .
[ हा लेख ' लोकशाही वार्ता ' या वृत्तपत्रातील , ' उंबरठा ' या पुरवणीत दिनांक २१-०६-२०११ ला प्रसिद्ध झाला आहे . धन्यवाद .]
लेखिका - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment