मी धनगर

मी सात आठ वर्षांची असेल जेव्हा आम्ही कोराडी वसाहत मध्ये राहायला आलो. नवीन असल्यामुळे कोणीही ओळख करून घेतांना 'नाव-गाव' विचारून झाल्यावर 'जात' विचारायचं. तेव्हा मी, दादा भाबडे पनानं 'मी धनगर' असल्याचं सांगायचो. [पोटजात तेव्हा माहित नव्हती.] मग काय आम्ही ज्या मुलांसोबत खेळायचो तीच कधी कधी आम्हाला,'मेंढपाळ मेंढपाळ' म्हणून चिडवायचे, तर कधी जंगलात फिरणारे, तिथंच राहणारे 'जंगली' म्हणून हिणवायचे. खूप वाईट वाटायचं. मला तर वाटत होतं, मोठं झाल्यावर सर्वात आधी जात बदलवून टाकायची. लहान बुद्धी माझी, म्हणून  असा विचार करायची. कारण वर्गात जेव्हा सोनाराला सोनं घडवणारा सोनार म्हटलं जाई तेव्हा त्याचा खूप हेवा वाटायचा. मनात यायचं, आपल्याही जातीचं असं काही महत्त्व का नाही?खूप राग होता मनात 'धनगर' शब्दावर. पण काही दिवसांनी जेव्हा बाबांनी कुठून तरी 'अहिल्याबाई होळकरांचा' फोटो आणला तेव्हा कळलं कि आपल्याही जातीला एक महान असा 'इतिहास' आहे.
मग पुढे मी अधिकाधिक माहिती शोधात गेले धनगरांबद्दल. ज्यात मला खूप छान छान माहिती मिळाली. 'धनगर' ह्या शब्दाचा अर्थ,'जे धनी आहेत' असा होतो हे वाचल्यावर माझ्या मनातला सोनाराचा हेवा निघून गेला. खूप गम्मत वाटली. वाटलं जी मुलं मला चिडवायची त्यांना जाऊन सांगावं कि धनगर म्हणजे फक्त मेंढपाळ होत नाही, तर धनगर म्हणजे,'धनी' असा सुध्दा होतो. खास म्हणजे आपण मुळात क्षत्रियांचे वंशज आहोत, वाचल्यावर कसं अंगातील रक्त गरम होतं. म्हणूनच तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्वात जास्त सैनिक हे धनगर होते. त्यांचा आपल्या ह्या सैन्यावर खूप विश्वास होता. तसेच धनगर हे महादेवांची खूप भक्ती करतात. म्हणजे जेव्हा ते आपल्या मेंढ्या पाळतात, त्यांना चरायला नेतात त्यांच्या तोंडून आपोआप 'हर हर' हे शब्द बाहेर पडतात. हे तर मला माहीतच नव्हतं. मला तर वाटायचे माझे काका मेंढ्यांना,'हल हल' असंच म्हणतात त्या मेंढ्यांनी हलावं म्हणून. आणखी खूप काही अभिमानास्पद गोष्टी आहेत 'धनगरांच्या.' पण आता नको. पुढल्या सोमवारी. आणि हो मला आता खूप अभिमान वाटतो, जेव्हापण मी कुणाला,'मी धनगर' असल्याचं सांगते. 

Comments

Post a Comment