प्रेम - 2

आमची एक ताई आहे. लग्न झालेली, एका मुलीची आई! एका सामान्य मुलीसारखीच तीही. सदोदित आनंदी राहणारी. एकदा मी वर्गात एकटीच असतांना म्हणाली,''अर्चू प्रेम नक्की काय असतं गं?'' मला तिचा प्रश्न विचित्रच वाटला. कारण तिचं ठरवून लग्न झालं होतं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचा काही भूतकाळही नव्हता. मग अचानक असा प्रश्न का? तरीही मी उत्तर दिलं,''प्रेम म्हणजे प्रेम! ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखासाठी जे जे करता येईल ते सर्व करणं म्हणजे प्रेम.''
''ओके! समजा आपण असं केलं,आपलं प्रेम आहे म्हणून मागचा पुढचा कशाचाच विचार न करता, त्या व्यक्तीसाठी, त्याला हवं ते केलं, आपल्यावर आतोनात विश्वास असणाऱ्या व्यक्तींचा विश्वास तोडून त्याला सुखी केलं. पण एवढं करून एक दिवस जर त्यानं आपल्याला,'तू तुझ्या आयुष्यात सुखी राहायचा प्रयत्न कर, माझा विचार सोडून दे.' असं म्हणून दूर केलं तर काय समजायचं? आपण त्याच्यावरच्या प्रेमापायी किती लोकांचा विश्वासघात केला. हे सांगितल्यावर तो म्हणाला,'तू तेव्हा इतकं इमोशनल व्हायची गरज नव्हती, मी माझं बघितलं असतं.' तर काय करायचं? सोडायचं त्याला?''
मला तिचा केविलवाना स्वर अजिबात सहन झाला नाही. मी म्हटलं,''लात मारायची त्याला.'' माहित आहे हे म्हणणं सोपी पण करणं अतिशय कठीण आहे. परंतु ज्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची कदर नाही, जी व्यक्ती 'काम सरो आणि वैद्य मरो' ह्या प्रवृत्तीची आहे. तिच्यासाठी तुम्ही कितीही तडफड केली तरीही तो फक्त त्याचा स्वार्थच पाहतो, तुमचे प्रेम नाही. जरी ताई म्हणत असली कि तिचा काही भूतकाळ नाही तरीही मला हे जाणवलं कि तिचा भूतकाळ तिच्या भविष्यात डोकावतोय आणि ती त्याला थांबवू शकत नाहीय. मला तिची मदत करता आली असती पण मी तिला काही विचारण्या आधीच कोणीतरी वर्गात आलं आणि तिनं लगेच विषयांतर केलं. नंतर कधी असा एकांत मिळाला नाही ना ताईने पुन्हा तो विषय छेडला. पण दिवसेंदिवस तिचा अधिकच केविलवाना होत जाणारा चेहरा फक्त मलाच कळतोय. अन तो बघून माझं मन म्हणतंय,  
''कधी कधी खूप सुंदर वाटतं हे प्रेम,
तर कधी कधी खूप विचित्र जाणवतं हे प्रेम,
उगीच आपल्याला सुन्न करून जातात ह्याचे विचार.
आपल्या भावनांना नाचवतात जणू ते विचार.
कधी कधी खूप मलीन करतं सारं,
पवित्रतेच्या कल्पना भस्म करतं सारं,
कोणत्या खेळात गुंतलोय असं मन चिंतत.
विश्वासाच्या कळ्या आपणंच खुळल्या,
नात्यांना डाग आपणंच लावला,
आपल्या ह्या कर्माचे फळहि कडूच मिळेल,
माहित असून का हे कर्म केले आपण?
कधी आधार होतो आपण,
आज आधारहीन झालोय,
असं काहीसं चित्ती उरतं सारं.


Comments