प्रेम

शुक्रवारची सकाळ 'मैत्र' वाचल्याशिवाय अधुरी अपुरी असते माझ्यासाठी. इतकी सवय झालीय ते ठीक आहेच पण त्याच बरोबर 'लोकमत' वृत्तपत्राच्या ह्या पुरवणीने वेळोवेळी माझं छान मार्गदर्शनही केलं आहे. तर नेहमीसारखंच आजचा अंक मी हाती घेतला आणि आठवलं कि चारच दिवसांनी चौदा फेब्रुवारी म्हणजे valentine day [प्रेम दिवस] आहे. सर्व प्रेमवीरांची मोठमोठी प्लानिंग झालेलीच असेल. काहींची छोटी छोटी! पण मनापासून कधी कोणी विचार केला आहे का ह्या प्रेमाचा? तुम्ही म्हणाल मनापासून कशाला बेंबीच्या देठापासूनही आम्ही विचार केला आहे प्रेमाचा. ओके ओके मी आता इतरांसारखं भाषण न देता एक प्रसंग सांगते.
मी खूप भाग्यशाली आहे कि मला सर्वच शिक्षक मंडळी खूप छान मिळाली. त्यातीलच एक बोधनकर सर! त्यांचं शिकवणं झालं कि ते आम्हाला वैयक्तिक आयुष्याबद्दल असलेल्या प्रश्नांचं निरासारण करतात. असंच एकदा  माझ्या वर्गातील एका मुलाने सरांना प्रेमाबद्दल विचारलं,''सर इतक्यात हे प्रेम प्रकरणं खूपच वाढलीत. पळून जाणे, घरच्यांना न जुमानणे...हे योग्य का?''
सर नेहमीसारखेच हसले आणि त्यांनीच उलट विचारलं,''कोण म्हणालं कि 'प्रेम' करणं, घरच्यांना न जुमानता लग्न करणं हे इतक्यातच वाढलंय?'' त्यांच्या प्रश्नानं आम्हाला चकित केलं. ते पुढे म्हणाले,''प्रेमात जीव देणं, जीव घेणं, घरच्यांना न जुमानता प्रेमविवाह करणं हे तर हजारो वर्षांपासून चालत आलं आहे. पुराणांमध्ये ह्याची कित्येक उदाहरणं मिळतील आपल्याला. जसं महादेव आणि सती, कृष्ण आणि रुक्मिणी आणि कितीतरी. फरक एवढाच कि त्यांनी कधीच आपल्या प्रेमाचा गाजावाजा केला नाही. काहीही झालं तरी आपल्या वडिलधाऱ्यांना त्यांनी उलटून उत्तर दिलं नाही. सदैव त्यांनी त्याच व्यक्तीचा जप केला जिच्यावर त्यांचं प्रेम होतं आणि तोच त्यांचा ध्यासही. हे सर्व आजच्या युवकांकडून होत नाही. आपल्यासाठी योग्य काय नि अयोग्य काय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. ज्याच उत्तर त्याच्याजवळच असतं. मला फक्त एवढंच वाटतं कि जर खरंच तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं बनवू इच्छिता तर मग त्याचा पूर्णत्वाने स्वीकार करा. नाहीतर आजची प्रेमविवाह केलेली जोडपी बघा. लग्नाला दोन महिने होत नाही तो त्यांचं होतं सुरु,''मला जर आधीच तुझा स्वभाव असा असल्याची जाणीव झाली असती तर मी मुळीच तुझ्याशी लग्न केलं नसतं.'' हे बोलतांना तो/ती आपल्या जोडीदाराचे मन तर दुखावातच पण ते हेही विसरतात कि आता लग्न झालंय आणि आयुष्य हे आपल्याला ह्याच व्यक्तीबरोबर घालवायचं आहे, मग तिचे/त्याचे गुण दोष स्वीकारून आनंदानं जगायचं ना! पण हे सर्वांना जमत नाही आणि म्हणून घटस्फोट होतात. घटस्फोट झाला तर ठीक परंतु काही जोडपी 'प्रेमविवाह' हा आपला निर्णय होता, म्हणून तो निर्णय चुकला तरी केवळ घरचे जवळ करणार नाही, समाज टोमणे मारेल ह्या भीतीनं ते नातं  निभावतात आणि वेळोवेळी हे आपल्या जोडीदाराला बोलूनही दाखवतात व एका नवीन वादाला जन्म देतात. ज्यामुळे त्यांचं घर हे घर न राहून युद्धाचं मैदान होतं. पुढे हे सर्व संस्कार मुलांवर पडतात आणि अशाच वातावरणात वाढलेल्या काही मुलांचा विवाह संस्कृती वरून विश्वास उडतो व ती मुलं मग live in relationship सारख्या गोष्टींना आपल्या जीवनात जागा देतात. का तर आपल्या आईवडीलांसारखी गत आपली होऊ नये म्हणून!''
बापरे प्रेम, लग्न, मुलं सारंच झालं. मग आजच्या साठी एवढंच पुरे.

Comments