बरबाद!

हा लेख २४-०२-२०१२ च्या लोकमत वृत्तपत्रातील सर्वाधिक प्रिय 'मैत्र' ह्या पुरवणीत प्रसिध्द झाला आहे.
विषय होता,''छेडछाडीचे बळी!''

कॉलेजच्या सुरक्षित वातावरणातही ती खूप कोमेजलेली दिसायची. गेट वरील चौकीदार भाऊ असो व एखादे तरुण सर असो, ते दिसताच ताईचा चेहरा पंधरा फटक पडून जायचा. मी तिला भेकडच म्हणायची. वाटायचं नशीब मुलींचेच कॉलेज आहे. मुलं असती तर बया आलीच नसती कॉलेजात! अशातच एकदा क्लासमध्ये सर्वांना आपापला सर्वात वाईट अनुभव सर्वांसमोर मांडायचा होता. तेव्हा ताईचा अनुभव ऐकून मी शहारून गेली. मला कळून चुकले कि मी किती चुकीचे समजले होते तिला. ताई दिसायला सुंदर, उंच, गोरीपान आणि अगदी सुडौल. अकरावीत असतांना तिचा उत्साह, तिचं सौंदर्य काही टवाळ खोर तरुणांच्या नजरेत खुपलंच जणू. ते टवाळखोर तिला कॉलेज समोरच छेडू लागले. कधी शिट्ट्या मारून तिचे नाव घेणे, कधी घाणेरडी गाणी म्हणणे. हा त्यांचा नित्यक्रम! पण एक दिवस त्यांनी कहरच केला. तिचा रस्ता अडवून तिचा हात पकडला. सोबतची मैत्रीण काहीच न बघितल्यासारखे करून आपल्या वाटेने चालती झाली. ताई बिचारी रडत होती आणि ते टवाळखोर हसत होते. त्या रात्री ती उशीत तोंड दाबून खूप रडली. वडील परगावी नौकरीला होते. म्हणून तिने प्राध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी त्या टवाळखोरांना दम दिला. दोन तीन दिवस ती मुलं ताईच्या वाटेला गेली नाहीत. पण चौथ्या दिवशी ताई पुरती हादरून गेली. ती मुलं ताईच्या घराजवळ जाऊन तिला छेडू लागली. लोकांकडून चांगुलपणाची आशा ठेवणे चुकीचे. त्यांनी ताईलाच नावं ठेवली. पण कोणी पुढे जाऊन त्या मुलांना थांबवले नाही. शेवटी एका महिला सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना तंबी दिली. तेव्हा ती मुलं शांत झाली. पण ताई खूप depression  मध्ये गेली होती. दीड दोन वर्ष घराबाहेर पडली नाही. आत्मविश्वास हरविल्या मुले तिने सायन्स सोडून आर्टला admission घेतली. अकरावी बारावी घरूनच दिली. थोडी सावरली तेव्हा नियमित कॉलेज करू लागली. आज ती एका नामांकित मराठी न्यूज चेनेलवर न्यूज रीडर आहे. तरीही तिला जीवनात कुणी पुरुष नकोय. एकेकाळी राजकुमाराची स्वप्न पाहणारी ती आणि आजची ती! खूप फरक आहे .... म्हणून मुलांनो, कुण्या मुलीला छेडायच्या आधी प्लीज एकदा विचारात जा स्वतःला,''हे जरुरी आहे का? छेडायलाच हवं का मुलीला?''

Comments