लाखो में एक !
दहा बारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दुपारी एक ते दीड च्या दरम्यान एक पाच मिनिटांचा कार्यक्रम असायचा,'किरण'! ह्या कार्यक्रमात पाच मिनिटात अशा एका व्यक्तीची ओळख दिली जायची ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य समाजकल्याणासाठी वाहले आहे. तो कार्यक्रम पाहल्यावर कळले कि समाज कल्याण किंवा समाजसेवा म्हणजे केवळ अनाथ मुलांना वागवणे किंवा अपंगांना रोजगार देणे नव्हे तर समाज कल्याण किंवा समाजसेवा म्हणजे वृक्षांचे संगोपन करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आरोग्य संगोपन करणे, अंध श्रध्धेला थारा न देणे, साक्षरतेचे महत्व पटवणे अन त्यासाठी चंदन होऊन झिजणे. त्यांना बघून वाटायचे, हि माणसाची नक्की कोणती जात असेल, जिला जनकल्याणाशिवाय आणखी काही दिसतंच नाही? खूप inspiring व्यक्तिमत्व पाहायला मिळाली तेव्हा. समाजसेवेचे बाळकडू ह्या किरणच्या माध्यमातूनच मला मिळाले असं म्हटल्यास काही हरकत नाही. अजूनही कधी कधी समाजसेवेचे झटके येतात आणि काहीतरी प्रेरणादायी करावं वाटतं. काय करावं ? अजून समजलं नाही ते वेगळं, तरी आपले छोटे मोठे प्रयत्न सुरूच असतात. म्हणजे काही नाहीतर समाजोपयोगी लिखाणच करायचं. पण खरंच अप्रतिम असा कार्यक्रम होता किरण अन अप्रतिम असं संगीत आणि निर्देशन होते त्याचे. फक्त वेळ तेवढा खूप कमी असायचा. त्यामुळे टि व्ही समोरच बसून राहावे लागत होते त्या दरम्यान. नाहीतर एक व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रेरणा निसटली हातातून. म्हणून मला नेहमी वाटायचे कि असाच एखादा कार्यक्रम अर्धा एक तासासाठी असला तर किती छान... पण तसे काही कधी झाले नाही आणि काळाच्या ओघात मलाही 'किरण'चा विसर पडला. पण 'लाखो में एक' च्या जाहिरातीने मला पुन्हा एकदा 'किरणची' आठवण करून दिली. 'सत्यमेव जयते' ची महती आपल्या सर्वांनाच माहित आहे. मी त्याचा एकही भाग सोडला नाही. सत्यमेव जयते संपले याची खंत नक्की वाटली पण त्याच्या जागी माझी बारा तेरा वर्षां पुर्विची मंशा पूर्ण करणारा 'लाखो में एक' हा कार्यक्रम सुरु झाला ह्याचा आनंदही खूप झाला. मी स्टार प्लस ची मनापासून आभारी आहे, आधी 'सत्यमेव जयते' आणि आता 'लाखो में एक' असे कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल. धन्यवाद!
Comments
Post a Comment