पाणी

उन्हाळा डोक्यावर आला कि , 'पाणी समस्येचे निवारण कसे करायचे ?' या प्रश्नाचे वेध सर्वांनाच लागतात . हे दरवर्षीचेच आहे . पण काळ जस जसा पुढे जातोय , पाणी प्रश्न हा अधिकच जटील होतोय . काही दिवसांनी फक्त उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याची टंचाई राहील असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञ वारंवार देत आहेत. कारण प्रमाणाबाहेर जमिनीतून पाण्याचा उपसा होतोय आणि त्यामुळे गाव खेड्याच्या कधीही न आटणाऱ्या विहिरी आता कोरड्या पडत आहेत. गावोगावी थेंब थेंब पाण्याला फक्त जनावरेच नाही तर माणूसही तडफडत आहे. काही ठिकाणी पंधरा ते वीस दिवसातून एकदा नळ येत असल्यामुळे पाणी साठवून ठेवावे लागते . अन साठवलेल्या पाण्यातून रोगराई पसरते . अशात ज्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळतेय त्यांनी पाण्याची उधळपट्टी करावी कि ते जपून वापरावे ? शहाणा माणूस हेच म्हणेल कि पाणी जपून वापरावे . स्वतः पासून सुरुवात करून इतरांसमोर आदर्श ठेवावा . पण ज्यांना आपण आदर्श मानतो अशाच उच्चभ्रू , समाजात मनाचे स्थान असणाऱ्या व्यक्तीनेच या जीवनमोल पाण्याला मोलरहित केले तर ? त्याच व्यक्ती कडून थोडे थोडके नव्हे तर ८ ८ ० ० ० लिटर पाण्याचा होळीच्या नावाखाली नास होत असेल तर काय करावे? त्या व्यक्तीला अनुयायी मानून चालणारे या पुढे पाणी जपून वापरतील का ? आपण समजलेच असाल मी कोणाबद्दल बोलतेय ते. नाव लिहिण्याची गरजच नाही इथे कारण ,'समझने वाले को इशारा काफी है । ' होळी दहा दिवसांवर राहिली तेव्हापासून मनपा सारखी सांगत आहे , सूचना देत आहे ,'होळीला पाण्याची उधळण करू नका . कोरड्या रंगांनीच होळी खेळा . पाण्याचा अतिरिक्त वापर करू नका .' मला तर वाटतेय या सूचना फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत . बर सोडा सूचनांचं आणि वापरा पाणी . पण त्याला काही सीमा . कृष्ण होळी खेळायचा तो पिचकारीने , इथल्या कृष्ण्भक्तांनी तर पाईपनेच पाण्याची उधळण केली . मग यांच्या भक्तीत आणि तरुणांच्या रेन डान्स मध्ये काय फरक राहिला ?
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यांना एवढे पाणी मिळाले कुठून ? इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतांना शासन झोपलेले होते का ? बहुतेक शासनाने पाणी टंचाई वर बजेट वाढवला वाटतं . आणि हे शासनच गावोगावी दुष्काळामुळे फाटलेल्या जमिनीला पाणी पुरवणार [स्वप्नात ]. झालेल्या प्रकाराबद्दल नक्की कोणाला दोष द्यावा ते कळत नाही . सामान्य माणसातील जागरूकता मेलिय अजून काय . त्या पाण्याच्या उधळपट्टीत समाविष्ट झालेल्या लोकांना तरी त्यांनी काय गमावले याचे भान आहे का ? ते तर आताही नको त्या भक्तीतच गुंग आहेत . म्हणे आमची श्रद्धा [अंध श्रद्धा ] आहे तिथे . जी श्रद्धा वाममार्गाला लावते ती काय कामाची ? मी तर एकच म्हणेल ,
                         रानातल्या चीटपाखरा नको भरकटू इकडे तिकडे ,
                         तुझे मरण लिहिले गेलेय नक्की ,
                         कारण इथे न नीर कुठे तुजसाठी ………

 Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments