तिच्या पाळीचं माजण!


मीरा नववित असतांना तिला पहिल्यांदा पाळी आली. "मीराची ओटी नाही भरणार का?" शेजारच्या ललिता काकूंनी मीराच्या आईला विचारलं.
"हो भरणार ना. उद्या संध्याकाळी बोलावते सगळ्या बायकांना. तुम्ही या हं."
"हो हो. नक्की !"
पाचव्या दिवशी मीराला आईनं न्हाऊ घातलं. नवीन कोरा ड्रेस दिला. संध्याकाळी बायकांनी मीराची ओटी भरली. तिला खूप अवघडल्या सारखं झालं. हे असं उगाच काय माजण करताहेत पाळीचं. तिला पडलेला प्रश्न ! उत्तर द्यायला कोण रिकामं नव्हतं. उलट तिलाच सगळ्या बायका सांगू लागल्या, "आता इकडे तिकडे हुंदडणं बंद करा मीराबाई."
"मोठी झालीस तु. जपून राहा."
"मुलांच्या तर दहा हात लांबच राहा."
"2 -3 वर्षांनी लग्न होईल. घरात आईला मदत करा. कामं शिका." ही पाळी म्हणजे लय तापदायक कारभार असं मीराला कळून चुकलं. तसंच आईचा रागही आला की तिनं कशालाच बायकांना सांगितलं पाळीबद्दल? सगळं माजण झालं. आईनं तिला समजावलं की ही एक प्रथा असते आपल्याकडे. ज्यामुळे समाजाला कळतं की ही मुलगी आई होण्यासाठी सक्षम झाली आहे.
"आणि एखादीला आईच व्हायचं नसेल तर?"तिला परत प्रश्न पडला. पण आईला विचारला नाही. कारण या प्रश्नावर रट्टा पडणं नक्की.
मीराची दहावीची परीक्षा झाली. बारावीचा अभ्यास सुरु करण्याआधी थोडं रिलॅक्स व्हावं म्हणून ती मावशीकडे काही दिवस राहायला गेली. मावशीच्या समवयीन मुलीशी पायलशी तिचं छान जमायचं. मीरा तिथं गेल्यावर चारच दिवसांनी पायलची पाळी आली. पायलला मावशीनं वेगळं नाही बसवलं. मीराला बरं वाटलं. पण तिनं बघितलं की पायल वापरलेले पॅड धुवून काढायची, सुकवायची अन पाळी संपली की सर्व पॅड जाळून टाकायची. तिनं पायलला विचारलं, "असं का करतेस?"
"आई म्हणते की वापरलेल्या पॅड वरून साप गेला तर बाई वांझोटी होते. म्हणून धुवून, वाळवून जाळून टाकायचं. तु नाही जाळत."
"नाही. मी पेपरमधे बांधून सरळ कचऱ्याच्या बॅग मधे टाकते मग कचऱ्याची गाडी आली की कचरा त्यात जातो."
झालं, पायलनं हे तिच्या आईला म्हणजे मीराच्या मावशीला  सांगितलं आणि मावशीनं फोनवर मीराच्या आईला झापलं. इतकंच नाही नातेवाईकांत सगळीकडे हे पाळीचं माजण झालं. मीरा परत कधीच मावशीकडे फिरकली नाही.
आता मीरा बारावी पास होऊन इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला गेली. तिची पाळी सुरु असतांनाच तिची गावाला राहणारी आजी शहरात डॉक्टरला दाखवायचं म्हणून तिच्या घरी आली. मीरानं सवयी प्रमाणे वापरलेले पॅड पेपर मधे पॅक करून डस्टबिनमधे टाकले. आजीनं बघितलं की नात काहीतरी पेपरमधे गुंडाळून कचऱ्यात टाकते. कुतूहलापायी तिनं एक पेपर काढून बघितला. वापरलेला पॅड निघाला. आणि मीराला खूप ऐकवलं,
"आजकालच्या पोरीले कपडा रुतते माय. त्यायले मऊ कापसाची गादी पायजे. इतका लाड करु नाई जीवाचा. मा पोरगा तिकडे घाम गायतो म्हून तुमी अशे लाड पुरवता. नाय तं का फुकट येतात का त्या गाद्या घरी. आमच्या वाकती असं नाई चालायचं. जुनं लुगडं फाडून त्येच वापरो आमी किती किती दिवस."
आजीचं वय आणि तिचे त्या काळचे अनुभव समजून घेऊन आजीला कोणी काहीच बोललं नाही. पण आजीनं गावाला गेल्यावर मीरा पॅड घेते अन वाया जात आहे हे तिखट मिठ लावून सगळ्या बायांना सांगितलं. अन परत एकदा मीराच्या पाळीचं माजण झालं.
पाळी हा एका स्त्री साठी अत्यंत नाजूक हळवा विषय आहे. पण तरीसुद्धा खूपदा एक स्त्रीच ह्या पाळीचं असं माजण करते अन स्त्रीवर इतरांना हसायला आणि बोट उठवायला संधी देते.
धन्यवाद
नोट - माजण म्हणजे to create issue किंवा बोभाटा.


फोटो साभार गौरी वानखडे (actress & model)

©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये.

धन्यवाद !

Comments