माझी मैत्रीण सोनू 😇
किशोर वयात असतांना आईनी काही घरकाम करायला सांगितलं की मी आईला हमखास म्हणायची, "हे बघ आई मी हे धुणं भांडी, स्वयंपाक वगैरे घरकाम अजिबात करत बसणार नाही. मी जॉब करेल आणि मोलकरीण ठेवेल." कारण तेव्हा मला वाटे की नोकरी करणाऱ्या मॉडर्न मुली घरकाम करत नसतात. त्यांना सगळं हातात मिळतं.🤭
पण तिला भेटली आणि कळलं की माझी ही कल्पना अगदीच चुकीची आहे. मुलगा मुलगी, घरी राहणारी, मॉडर्न असो वा नोकरदार कमीत कमी स्वतः पुरतं तरी घरकाम यायलाच हवं आणि घरकामाला आपण हातभार लावायलाच हवं.
दिसायला सुंदर, गोरी गोरी, लांब सोनेरी केस, राहायला टीप टॉप, जीन्स टॉप घालणारी, स्वभावाने चूलबुली, खळखळ हसणारी, मोकळ्या मनाची पण परिस्थितीच भान ठेऊन वागणारी. प्रचंड मेहनती. सगळ्यांचा आपुलकीनं विचार करणारी. सुट्टीचा दिवस हमखास घर स्वछतेला देणारी. एका रविवारी आमचं शॉपिंग करायला जायचं ठरलं. तिनं वेळ दुपारची दिली. वाटलं 10 वाजेपर्यंत झोप काढायची असेल. बोर होत होतं मला. म्हणून थोडं लवकरच मी तिच्या घरी गेली. तर मॅडम घर पुसत होत्या. तिनं प्यायला पाणी दिलं आणि हॉल मधे बसवलं. मग टॉयलेट बाथरूम स्वच्छ केलं. आंघोळ केली. कपडे मशीन मधे लावले आणि तयारी केली. मला फार आश्चर्य वाटलं. इतकी मॉडर्न मुलगी घरकाम करतेय. तेही फरशी पुसणं, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणं. इतकी एनर्जी हिच्यात कुठून येत असेल बरं?
इतकंच नाही तिच्या हातच्या भाज्या... अप्रतिम ! पनीर ची दुध घालून केलेल्या भाजीची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. इडली, डोसा, पावभाजी आणि सर्वच नॉनव्हेज पदार्थ ती आवडीनं बनवते आणि खाऊ घालते.
लग्नानंतर नवीन संसाराच्या मागण्या पूर्ण करता करता अहोंचा खिसा लवकरच खाली होऊन जातो. असं मी सहजच तक्रारीच्या स्वरात तिला सांगितलं तर म्हणाली,
"त्याच्यावर सगळं ओझं नको लादु. शिकलेली आहेस. नोकरी कर. म्हणजे पैसा तर येईलच पण हे सगळे विचार करायला वेळ मिळणार नाही."
आयुष्यात अडचणी येतच असतात. हिम्मत ठेऊन, मेहनत करून आपण त्यांच्यावर मात करायची. इतकी समजदार. सृजन मुलगी माझी मैत्रीण असल्याचा मला अभिमान वाटतो.
तूझ्याकडून मी,' चार कामं शिल्लक केल्यानं आपण झिजत नाही तर सफलतेच्या जवळ जातो' हे शिकली आणि म्हणूनच (कोरोनामुळे कामवाली बंद आहे) मोलकरणीच्या मदतीशिवाय ऑफिस आणि घर दोन्हीही संभाळतेय. कोणत्याही गोष्टीची तक्रार करत न बसता उपाय योजना करण्याची प्रेरणा मला तुझ्याकडूनच मिळाली. थँक्यू डियर !
माझ्या आईनं बनवलेल्या चिवड्याची फॅन माझी ही प्रिय लाडाची मैत्रीण म्हणजे LAD कॉलेजची देन असलेल्या मैत्रीण रुपी चार रत्नांपैकी एक आमची सोनाली.
ज्या घरी जाईल त्याला स्वर्गापेक्षा सुंदर बनवेल हे नक्कीच !
सोने आज वाढदिवसाला आभाळभर शुभेच्छा. यशस्वी हो, सुखी राहा, तुला हवा तसाच जोडीदार मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना !
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
Comments
Post a Comment