भूतदया
(भूतदया - सर्व प्राणी मात्रांशी दया बुद्धीनं राहणं)
10-15 दिवसांपूर्वीचा प्रसंग. संध्याकाळी आंघोळीला गेलेले आमचे अहो एकदम बाहेर आले अन म्हणाले, "पाण्याच्या ड्रम मध्ये पालीचं पिल्लू पडून आहे."
"अच्छा! मग पाणी सांडून द्या खाली." माझा सल्ला.
"मे महिना आहे हा. सकाळी 10 ला आपल्या बिल्डिंग ची पाण्याची टाकी भरते. सर्व घरातच असल्यामुळे आणि कुलर मुळे ति दुपारी 11-12 वाजेपर्यंत खालीही होऊन जाते. अशात इतकं पाणी सांडून देणं बरं नाही."
"मग राहू द्या. सकाळी नळ येतील तेव्हा खाली करा ड्रम आणि धुवून भरा परत."
"ते तर करेलच मी. पण सकाळपर्यंत ते पिल्लु मेलं म्हणजे?"
"म्हणजे जिवंत आहे ते पिल्लु." मी लगेच बाथरूम मध्ये पाहायला गेली. कारण आतापर्यंत मला मेलेलं पालीचं पिल्लु पडलं आहे असंच वाटलं. ते पिल्लू बिचारं तडफडत होतं, शेपूट पाण्यात मारत होतं बाहेर येण्यासाठी. तशी आमच्या दोघांना पालीची भयानक भीती वाटते. पण आपण ज्यांना वाचवणं आपल्या हातात आहे त्यांना नक्कीच वाचवायला हवं. असं आम्हाला नेहमीच वाटतं. म्हणून अहोंनी एक शक्कल लढवली. ड्रम मधे पाणी भरायचा पाईप पालीच्या त्या पिल्लू जवळ टाकला आणि आश्चर्य ते पिल्लू सरसर पाईप वर चढून बाहेर आलं. अन क्षणात कुठेतरी गुडूप झालं.
जगात सर्वात जास्त भीती ज्याची वाटते त्या जीवाला वाचवून अहो इतके खुश झालेले पाहुन सहज मी त्यांना चिडवलंही,
"अहो पालीचंच पिल्लू होतं ते. ज्याला पाहताच अंगावर काटा येतो तुमच्या. काही कोणी माणूस नव्हता."
"मॅडम आमच्या आईची शिकवण आहे, भूतदया परमो धर्म!"
"छान हो छान !" मग कौतुकाची थाप देऊनच दिली.
दुसरा प्रसंग माझे बाबा पावसाळ्यात आमच्याकडे आलेले असतांना घरात अचानक खूप काळ्या मुंग्या निघाल्या. मला काही सुचत नव्हतं काय करावं. मी झाडू घेतला त्यांना झाडायला. तर बाबा म्हणाले,
"पीठ टाक थोडं. निघून जातील त्या बघ."
मला काही त्यांचं लॉजिक पटलं नाही. पण ते म्हणत म्हणून मी टाकलं पीठ आणि खरंच 15-20 मिनिटात मुंग्या पांगल्या.
हे दोन्हीही प्रसंग इथे सांगण्याचं कारण दोन दिवसांपासून गाभण हत्तिणीच्या मृत्यू (हत्या बाबत झळकणाऱ्या बातम्या आणि मेसेजस. खूप प्रयत्न करूनही त्या हत्तीणीचा आणि छोट्या गर्भाचा फोटो डोळ्यांसमोरून जात नाही आहे. मूक प्राण्याला जीव लावा, त्यांचं रक्षण करा, भूतदया परमो धर्म असा संस्कार देणारी आपली संस्कृती. अशा आपल्याच भारतात, आपल्याच देशात असं दुष्कृत्य झालंय या जाणिवेनं जीवाची पार घालमेल होत आहे.
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
archusonagre@gmail.com
Master diploma in counseling in mental health
फोटो साभार गुगल वरून
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरु
नये ही विनंती.
धन्यवाद !
Comments
Post a Comment