काळा गोरा

टीव्ही वरच्या जाहिराती पासून तर लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या प्रत्येकाला हाव असते ती गोऱ्या चमडीची. गोर गरीब म्हणा की श्रीमंत सगळ्यांना वाटतं पोटी जन्माला येणारा जीव गोराच असला पाहिजे. त्यासाठी ते आपआपल्या परीनं प्रयत्नही करतात. त्यांना मी वाईट असं मुळीच म्हणणार नाही. पण म्हणून निसर्गत: ज्यांना काळा वर्ण मिळाला आहे त्यांना अयोग्य वागणूक देणंही चांगलं नाही ना. लहानपणी वाटायचं हे सगळं फक्त आपल्याच देशात चालतं. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय इतिहास वाचण्यात आला तेव्हा समजलं की ही "कहाणी घर घर की" आहे. 
1955 मधली गोष्ट एक प्रेग्नेंट काळी स्त्री एका गोऱ्या माणसाला सीट द्यायला मना करते तेव्हा तिला अटक करण्यात येते. म्हणून मार्टिन ल्युथर किंग ll बसेसचा बायकॉट करणं सुरु करतात. परिणामी त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात येतो. या बॉम्ब कांड मुळे काळ्या लोकांना बस मधे गोऱ्यांच्या बरोबरीने बसण्याचा अधिकार मिळतो. पण मार्टिन ल्युथर किंग ll ज्यांना अमेरिकेचे गांधी म्हटल्या जातं ज्यांना आणखीही खूप कामगिरी करायची होती त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली जेव्हा ते फक्त 39 वर्षाचे होते. का तर ते अश्वेत म्हणजे काळ्या लोकांच्या नागरी हक्का साठी लढा देत होते.
पण हे झालं जुन्या काळातलं. जे आजही जगातील सर्वात प्रगत देशात होतांना दिसून येतंय. जर या सर्वांगीन विकसित देशाचीच ही स्थिती तर मग बाकीच्या विकसनशील देशांचं काय?

नुकतंच अमेरिकेत झालेलं प्रकरण सर्वांना माहीतच आहे. अमेरिका चांगलीच पेटली आहे सध्या या मुद्द्यावर. मी एकदाच ती बातमी पाहिली आणि जीवाचा थरकाप उडला. त्यानंतर जेव्हा पन ती बातमी झळकायची मी चॅनल बदलवायची. पण हा उपाय नाही हे मला समजलं. म्हणून इथं लिहून मन मोकळं करतेय. ज्याला मारलं गेलं तो खरंच गुन्हेगार असेल तर त्याला नक्कीच जेलात टाकायला हवं होतं. पण अशाप्रकारे रोडवर भर दिवसा पायानं त्याचा गळा दाबणं खरंच योग्य आहे का? किती दहशतीत जगत असतील तिथली कृष्ण वर्णीय लोकं याचा अंदाज आपण लावु शकतो. माणसाची मानसिकता इतकी विकृत का होतेय? की त्याला त्याच्या हातून कोणीतरी मारतंय हेही दिसून येत नाही. भर म्हणून इतर काय करतात, तोडफोड, लुटपात ! या सगळ्यात तेही होरपळल्या जातात ज्यांचा दूर दूर असल्या गोष्टींशी काहीच संबंध नसतो, ज्यांना त्यांचं आयुष्य शांततेत जगायचं असतं. 
शेवटी एकच वाटतं, 
इंद्रधनुचे सप्तरंग 
वेड लावी मनाला, 
निसर्गाचं हे सौंदर्य 
सुखावतं किती हो डोळ्यांना,
असंच हवं असतं 
रंगीबेरंगी आयुष्य सर्वांना, 
मग शरीराच्याच गोऱ्या रंगाची,  
हाव का असावी माणसाला? 
हा भाबडा प्रश्न 
उमलतो मनी माझ्या, 
जेव्हा केव्हा अन्याय होतांना दिसतो 
काळ्या गोऱ्या रंगापायी 
माणसावरच माणसाचा, 
अन काळं फासलं जातं
मनुष्याच्या माणुसकीला.... 

फोटो साभार pixabay वरून. 

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

Master in PG diploma in MENTAL HEALTH 
archusonagre@gmail.com
कथेचे सर्व अधिकार copyright कायद्या अंतर्गत लेखिकेच्या अधीन आहेत. नावाशिवाय आणि लेखिकेला न कळवता लेख वापरू नये.

धन्यवाद !

Comments