कथा - कसरत सोन्याचा पिंजरा तोडण्यासाठी
कथा - कसरत सोन्याचा पिंजरा तोडण्यासाठी
लेखिका - अर्चना सोनाग्रे वसतकार
"मला नोकरी करायची आहे." राणी.
"परत तेच आणि आता तर पिलु पण आहे." पायात साॅक्स चढवत राजा,"तुला काही कमी पडू देतो का मी. बायका तरसतात या आरामासाठी आणि तु....."
राजा टिफीन बॅग घेउन निघून गेला. राणीने पटपट आवरलं. सासुबाई सकाळचा फेरफटका मारून आल्या. त्यांना चहा नाश्ता देउन त्या काही विचारायच्या आत तीच बोलली,"मी जरा बाहेर जातेय. पिलुला भरवलंय. येते एकदीड तासात." चटकन बाहेर पडली. सासुबाई अवाक होउन पाहत राहल्या. आज पहिल्यांदा राणी त्यांना कुठं, कशाला जातेय न सांगतां घराबाहेर पडली. दिड दोन तासात परतली.
"काय गं कुठं आणि कशाला गेली होतीस? सांगीतलं नाही तु?" राणी घरात पाय ठेवत नाही तो सासुनं विचारलं.
"इंटरव्यू द्यायला गेली होती. उद्या पासून जाॅइन होतेय. सकाळी १० ते ५ पर्यंत. जवळंच शाळेत ॲडमिन म्हणून. ६००० पगार आहे." राणीने एका दमात सगळं सांगून दिलं.
सासू तिला काहीच बोलली नाही. पण राजाला फोन करून बातमी पोचती केली आणि म्हणाली आता या वयात मी काय काय करणार? १ वर्षाच्या पिलुला पाहणार की घरकाम करणार? तो घरी येताच धुसफुस करू लागला. त्यावरून राणीला कळलं की बातमी पोचती झाली. पण ती काहीच बोलली नाही. राजाला चहापाणी देउन स्वयंपाकाला लागली. जेवनं आटोपली. सासू आपली कान देऊन भांडनाच्या आवाजाची वाट पाहत होती. पिलूला पाळण्यात टाकून राणी राजाजवळ बसली. सासूला सांगीतलेली नोकरीबद्दलची माहिती तिने राजाला सांगितली.
"म्हणजे तु नोकरी करणारंच!"
"हो."
"अग हो म्हणतांना काही वाटतं का तुला? आई काय काय करेल? पिलू कसं राहील? विचार कर डोकं जाग्यावर ठेउन."
"सर्व विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. शाळा जवळच आहे. लंचटाईमला घरी येउन पिलूला भेटत जाईल."
"कर तुला काय करायचं ते, पण आमची रूटीन लाइफ डिस्टर्ब व्हायला नको. हे लक्षात ठेव!" एवढं बोलून तो त्याच्या मोबाईलमधे हरवला.
राणी मनोमन समाधानी झाली कि जास्त तनतन न होता राजा हो म्हणाला. किचनमधे गेली. सकाळी भाजी काय करायची? नाश्ता काय करायचा? सर्व ठरवून. होइल तेवढी पुर्वतयारी करून राणीही झोपली.
सकाळी पाचलाच उठली. आंघोळ करून स्वयंपाक, नाश्ता, दोघांचे डबे भरून रडून मागे लागलेल्या पिलुला कसंतरी खेळन्यांमधे रमवुन आॅफिसला निघाली. पावलं जड झाली. पण मनगटावरचं घड्याळ म्हणालं निघ आता. निर्णय घेतलाच आहे तर आता माघार नको. ति गेल्यावर सासूने राजाला फोन करून विचारलं की त्याने राणीच्या नोकरीला नकार का नाही दिला.
त्याचे उत्तर,"अग ती त्या महीला मंडळात जाते ना तिथं कान भरले तिचे कोणीतरी. नाहीतर एखादीचं पाहून हिला पण आली असेल गुर्मी MBA असल्याची. तु कोणत्याच कामाला हात लावू नको. फक्त आधीसारखी पिलुची काळजी घे. बघ आई गेल्या २-३ वर्षांपासून घरीच आहे ती. आरामाची सवय झाली आहे तिच्या शरीराला. आणि मनाचं पक्केपन म्हणशील तर हे बाॅस लोक आणि सिनीयर टुचकन्या मारून तोडतात माणसाला. इतकं सोपं नसतं कोणाच्या हाताखाली काम करणं. लवकरच समजेल तिला. घरचं बाहेरचं करून दमेल अन् बसेल घरी ती बघ! म्हणून म्हटलं काय वाद घालायचा. होउ दे थंडी!"
तसं पाहता राजाचं म्हणनं काही खोटं नव्हतं. लग्न होउन तीन वर्ष होत आलेली. साडेसहा सात वाजल्याशिवाय राणी कधी उठली नाही. आजही पाचला काहीशा कंटाळ्यानेच उठली ती! इतकी वर्ष राणी साधी शाॅपिंगला सुद्धा एकटी कुठे गेली नव्हती. आतातर ती पुर्ण दिवस बाहेरील जगाला एकट्याने तोंड देणार होती. आणि ते सोपं नक्कीच नाही. त्यात ॲडमिनचा जाॅब म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. आणि तेही एका नर्सरी ते बारावी वर्ग असलेल्या CBSC शाळेत. जिथे ३०-४० शिक्षक आणि १०-१५ इतर एम्पलाॅइ. इतक्यांच्या सुट्ट्या, पगार, शाळेचे इतर ॲडमीनिस्ट्रेशन रिलेटेड काम, हळूहळू सगळंच राणीच्या पारड्यात पडनार होतं.
शाळेतिल जुन्या आणि वयस्कर टीचर लोकांना मॅनेजमेंटचे असे कोणातरी नवीन मुलीला ऍडमीन बनवने अजिबात रुचले नाही. आधीच पंचिंग मशीन बसवून त्यांच्या शाळेत येण्याजाण्याच्या वेळेवर अंकुश बसवण्यात आला होता. त्यात (त्यांच्या कामात ढवळाढवळ करायला) ॲडमीन म्हणजे डोक्याला ताप! त्यांच्या मते आतापर्यंत त्यांना जसे मर्जीचे वातावरण होते तसेच पुढेही राहावे. त्यांनी येणार्या ॲडमिनला कसल्याच प्रकारचे सहकार्य न करायचे ठरवले.
राणीला प्रिंसीपलने शाळेत आतापर्यंत चालत आलेल्या मनमर्जी कारभाराची माहिती तिला इंटरव्यूच्या वेळेस दिली होती. "जाॅब टफ आहे पण तुही जिद्दी दिसतेस. म्हणून तुला संधी देतेय. तु तिचं सोनं कर!" राणीनेही ते केलं. ती सर्व टीचींग आणि नाॅन टीचींग स्टाफ सोबत नम्रतेने वागत होती. काहीही करायच्या आधी सिनीयर टिचर्सचे मत घेत होती. पण तरीही त्यांच्या चेहर्यावर नाखुशीच दिसत होती. शाळेतलं संपत नाही तो घरी आल्यावर पिलु संतापलेलं असायचं. दिवसभर दिसली नाही म्हणून राणीला चटचट चापटा मारायचं. त्याचं होत नाही तो सासूबाई,"दिवसभर खूप त्रास दिला ग पोरानी. डोकं भनभन करतेय. चहा दे चांगला करून कडक. मी पडते तोवर. आणि मग राणीची कसरत सुरू व्हायची. एकीकडे पिलू हे उचलणार, ते फेकनार... त्याला सांभाळत हिचं चहा आणि स्वयंपाक हे सगळं चालायचं.
रोज रात्री झोपतांना तिला वाटे,"उद्या नाही जाऊ शकणार मी शाळेत. खूप थकली मी. आता ही कसरत नाही होणार माझ्याकडून...."
पण सकाळ होताच तीची त्या सोन्याचा पिंजरा तोडण्याची इच्छाशक्ती जागृत व्हायची अन् ती परत कामाला लागायची. पण शरीर ते शरीर ते थकणारंच. तिचा पहीला पगार तिच्या हातात आला. ति खूप आनंदी होती. पण थकलीही होती. ब्लडप्रेशर वाढलं, ती शाळेतच चक्कर येउन पडली. प्रिंसीपल स्वता तिला डाॅक्टरकडे घेऊन गेल्या. डाॅक्टरने अतीताणामुळे हे झाल्याचं सांगितलं.
"तुझं शरीर आणि मन तुझी संपत्ती आहे. त्यांना सांभाळनं, त्यांची निगा राखनं तुझी पहीली जबाबदारी आहे. पण असं दिसतेय की तु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेस." प्रिंसीपल.
राणीने त्यांना तिची पुर्णकर्मकहाणी सांगितली. पण या सगळ्यांचा तिच्या कामावर काही विपरीत परिणाम होणार नाही असं आश्वासनही दिलं. सासुबाई आणि नवर्याला तिनं ठामपणे सांगितलं की भांडे घासायला आणि घर पुसायला बाई येत जाईल. तसेच या वयात सासुबाईंना खरंच पिलुमागं फिरावं लागतं. त्यांची दमछाक होते म्हणून दुपारी लंचटाईममधे येउन राणी पिलुला २ ते ५ संस्कार वर्ग आणि डे केयरला ठेवेल. तेवढाच सासुबाईंचा आराम होईल आणि रात्री त्या स्वयंपाकात तिची मदत तरी करतील किंवा पिलुला पाहतील.
राजाने थोडा वाद घातला. म्हणाला,"चार पैसे हातात नाही आले तर मॅडमचे चोचले सुरू झाले. म्हणून नाही म्हणत होतो मी नोकरीसाठी."
राणीने शांत राहण्यातच तिची भलाई समजली. कारण ब्लडप्रेशर वाढून त्रास तिलाच होणार होता.
सुरवातीला सासुबाई घरकाम करायला येणार्या बाईसोबत काम निट करत नाही म्हणून भांडल्या, तिला बोलल्या. पण राणीनेही बाईला आधीच परिस्थिती सांगीतलेली होती. त्यामुळे बाई सासुबाईंना काही उत्तरच नव्हती देत. फक्त मान हलवायची. शेवटी सासुबाई थकल्या.
पिलू छान रूळलं होतं पाळणाघरात. पाळनाघर जवळंच असल्याने सासुबाई कधीकधी जाऊन बसायच्या तिथं. नाहीतर घरी आराम करायच्या. त्यांना मनोमन पिलूला पाळणाघरात ठेवायची आयडीया पटली होती. शेवटी म्हातारं माणूस किती धावणार लेकरामागे. मग एखादवेळेस राणी घरी येताच सासू तिच्या हातात पाणी, चहा द्यायची. पिलुसोबत खेळायची. राणी मनोमन सुखावून जायची.
शाळेतही राणीचा आता बर्यापैकी जम बसला. आणि घरचंही वातावरण निवळत चाललं होतं.
"अगं एक वर्ष होईल आता तुझ्या नोकरीला. मी मानतो तु घर, नोकरी दोन्हीत उमदी आहेस. पण हौस पुर्ण झाली असेल तर पुरे आता." एक दिवस राजा राणीला म्हणाला
"राजा नोकरी फक्त एक हौस म्हणून नको होती मला. मला आवडतं बिझी राहायला. घरात राहून चिडचिड होते. डोकं काम नाही करत. हे मी तुला लग्नाआधीच सांगीतलं होतं. पण तु दुर्लक्ष केलं. मी नाही रे घरात पडून पलंग तोडणार्या बायांपैकी." त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन,"खूप कष्टाने मी या नोकरीत रूळली आहे. आता कुठं माझं त्या शाळेत एक स्थान निर्माण होत आहे. प्लिज मला माघार नका घ्यायला लाऊ."
राजाचा चेहरा पडला.
"तुला असेच वाटते ना की मला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की मी तुला विचारणार नाही. तुझं ऐकणार नाही."
"हो, म्हणजे कुठेतरी ती इनसिक्योरीटी असतेच पुरूषांना."
"पण म्हणून सर्व पुरूष त्यांच्या बायकांना घरात नाही बसवत ना!"
"हम्म!"
"माझा विश्वास कर. मी आज जशी आहे पुढेही तशीच राहील तुझ्यासोबत. चला झोपा. सकाळी ऊठायचं आहे लवकर."
राजाला झोप नाही आली. कितीतरी वेळ तो राणीबद्दल विचार करत राहला. कुठेतरी राणीचं म्हणनं पटलं त्याला. काहीतरी मनोमन ठरवुन तोही झोपला.
सकाळी चहा घेऊन पेपर वाचत न बसता राजा किचनमधे गेला. सासुबाई पिलूला घेऊन फेरफटका मारायला गेल्या होत्या. राणी कणिक मळत होती. राजाने लसण सोलायला घेतला. राणीला आश्चर्य वाटलं."मी करते. राहू दे."
"मी बोर झालाय तुझ्या हातच्या भाज्या खाउन. आज मी भाजी बनवणार." लग्नाला चार वर्ष झाल्यावर राजाने पहिल्यांदा किचनमधे पाऊल ठेवले. तेही चक्क भाजी करायला. राणीला तिनं एक वर्षांपासून केलेल्या कसरतीचं फळ मिळाले.
आता ते मिळून सर्व घरकाम करू लागले. एकमेकांच्या सोबत चालू लागले. कोणीच कोणाच्या पाठीमागे न राहता सोबत आले.
म्हणतात ना,'तुच तुझ्या जीवनाचा शील्पकार!' तसेच राणीचं झालं बघा. तीनं सोन्याचा पिंजरा तोडायची पहल केली नसती तर आयुष्यभर नवर्याला नाहीतर नशीबाला दोष देत बसली असती. हा थोडी जास्त कसरत करावी लागली तिला. पण त्या कसरतीचं फळही खूप गोड मिळाले ना!
तर माझ्या सखींनो मेहनतीला कसलाच पर्याय नाही हे लक्षात ठेऊन जिद्दीनं कामाला लागा. करा कसरत तुमची स्वप्न पुर्ण करण्यासाठी!
धन्यवाद!
@अर्चना सोनाग्रे वसतकार
ही कथा म्हणजे माझ्या 'सोन्याच्या पिंजर्यातील राणी'ची पुढची गोष्ट असं म्हटलं तरीही चालेल.
Comments
Post a Comment