कोणाचं काय नी कोणाचं काय
आमची ऑफिसच्या लंचची वेळ. सगळ्या मस्त हसत बोलत लंच करत होतो. पण एकीचे दुसरीकडेच लक्ष होतं. चेहराही उतरलेला. सकाळी सकाळी नवऱ्या सोबत वाजलं वाटतं आज पोरीचं. मी तिला विचारलं, "काय गं, काय बिनसलं आज?"
तर म्हणाली, "वाजलं सकाळी साहेबांशी (नवऱ्यासोबत )"
माझा अंदाज बरोबर निघाला तर.
"का? कशामुळे?"
"अगं ! सध्या कोरोनामुळे ऑफिस मधून आल्या बरोबर बाथरूम मध्ये घुसून सरळ आंघोळ करावी लागते. कपडे ही धुवायला मशीन मध्ये जातात. म्हणून मग आपले लवकर वाळतील आणि रोज धुतले तरीही चार दिवस टिकतील अशेच ड्रेस घालणं सुरु आहे. पण मागच्या दोन महिन्यांपासून तेच तेच कपडे घालायचा अगदी कंटाळा आला. ऑनलाईन चार टॉप बोलावले. चारातील एकाचीही फिटिंग बसली नाही ना कपडा ठीक वाटला म्हणून परत केले. म्हणून यांना म्हटलं, चला थोडं शॉपिंगला बाहेर. तर आलमारी उघडून म्हणले,
"आता परिस्थिती काय आहे अन तु बोलतेय काय? अन हे आलमारी भरून ड्रेस का पुजायला ठेवले?"
"मग !"
"मग काय? बोललीच नाही त्याच्याशी मी. अगं आलमारीतले सगळेच ड्रेस कुठे बाहेर जायला यायला घालावे असे वाटले. मग मनात आलं काय जीव चिकट म्हटलं. असले तर असले बाहेर या जायचे ड्रेस घालू ऑफिस मधेच. तसेंही ऑफिस सोडून कुठं बाहेर जातोय आपण फिरायला. नाहीतर आधी प्रत्येक रविवारी हॉटेलिंग ठरलेलीच. महिन्या दोन महिन्यातून एकदा सिनेमा पाहायचं ठरलेलंच. आणि बाकी इतर लग्न समारंभ , वाढदिवस, पूजापाठ, सणवार.... किती काही असायचं जेव्हा नवीन, कधीही फोटो न काढलेला किंवा ऍटलीस्ट क्वचितच घातलेला ड्रेस लागायचा. आता तर चार महिन्यापासून सगळं समीकरणच बदललंय जगण्याचं. लग्न समारंभ असो की आणखी काही पन्नास च्या वर लोकांना बोलवायचं नाही म्हटल्यावर कोण बोलावणार अन कुठं आपण आपली शान मिरवणार आणि इतके भारी भारी जमवलेले कपडे, साड्या, ज्वेलरी ऑफिस मध्ये कसं घालणार? जाम टेंशन आलं आहे गं!"
मला खरं तर पोट धरून हसावं वाटलं. पण स्वतःला आवरत आणि गंभीरपणाचा आव आणून मी तिला म्हटलं, "ते सगळं ठीक आहे गं. मला तर दुसरीच भीती आहे."
"कसली?"
"समजा खरंच अमेरिका आणि चायनात युद्ध झालं आणि आपण मेलो तर?"
"तर?"
"तर आपण जमवलेल्या कपड्यांचं काय होणार?"
"अय्या हा विचार तर मी केलाच नाही."
"नाही ना, मग आता कर आणि काढ ते कपडे घालायला."
"हो हो." तिचा चेहरा अगदी उजळून निघाला, "बघ उद्याच, तो पिंक चंदेरी ड्रेस घालून येते मी!"
कोणाला कशाची पडलेली तर कोणाला कशाची? कोणाचं काय नी कोणाचं काय? असो, काय करावं ! मैत्रिणीला तर आपण उदास नाही पाहु शकत ना राव !😃
काय मग सख्यांनो सणवार सुरु होताहेत. तेव्हा प्लीज यावर्षी जरा दमानं घ्या अन तुम्हीही शॉपिंग साठी म्हणून सध्यातरी बाहेर पडू नका हं ! काढा तो कपाटात पुजून ठेवलेला लवाजमा ! करा थोडं मिस मॅचिंग. दाखवा आपली क्रिएटिव्हिटी नाहीतर you ट्यूब आहेच.
घरी राहा, आनंदी राहा !
धन्यवाद !
फोटो साभार गुगल वरून.
#कोरोना #coronavirus #quarantine #onlineshopping #shoppinglover #festivals #festivemood
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
PGDCMH (post graduate diploma in counseling in mental health)
लेख आवडला म्हणून शेयर केला तर चालेल पण लेखिकेच्या नावासकट हा.
Comments
Post a Comment